नवाब मलिकांची प्रकृती खालावली; जेजे रुग्णालयात उपचार सुरू
मुंबई - कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती ढासळली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून गेल्या तीन दिवसांपासून जे जे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नवाब मलिक यांच्या वकिलाने कोर्टात सोमवारी ही माहिती दिली.
नवाब मलिक यांचे वकील कुशल यांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीय घरचं जेवण देण्यासाठी जेलमध्ये गेले असता त्यांची प्रकृती ढासळली असल्याचं समोर आलं. नवाब मलिक खूप आजारी असल्याचं सांगत कुशल यांनी कोर्टाकडे त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली.
विशेष न्यायमूर्ती आर एन रोकडे यांनी तुरुंग प्रशासनाने नवाब मलिकांच्या प्रकृतीविषयी कोणतीही माहिती न दिल्याने तसंच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याने काळजी व्यक्त केली. यानंतर कोर्टाने नवाब मलिकांच्या प्रकृतीविषयी तसंच तिथेच त्यांच्यावर उपचार केले जाऊ शकतात का यासंबंधी रुग्णालयाकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. ५ मे पर्यंत हा अहवाल सादर करायचा आहे.
नवाब मलिकांना वैद्यकीय जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. जामीन अर्जात नवाब मलिक यांना कोर्टाला किडनीच्या आजारांमुळे प्रकृती ठीक नसून पायांना सूज असल्याचं सांगितलं होतं. त्याच वेळी खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी परवानगी देण्याचीही मागणी केली होती.
Comments
Post a Comment