कायदेशीर बाबी जाणून घेऊन कारवाई करू, राज ठाकरेंना गृहमंत्र्यांचा इशारा
मुंबई - औरंगाबादमधील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोग्यां संदर्भात अल्टिमेटम दिला आहे. ईद नंतर भोंगे उतरले नाहीतर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा म्हणू असा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र या भाषणानंतर राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना आम्ही कायदेशीर मतं जाणून घेऊन कारवाई करु अशी माहिती दिली आहे. देशात जाणुनबुजून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचंही दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. तसंच उद्या ईदच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक होणार असून यावेळी कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे. “राज ठाकरेंच्या भाषणात फक्त भोंगे, शरद पवारांवरील टीका आणि त्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं प्रक्षोभक वक्तव्यं मला पहायला मिळालं,” अशी टीका दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. राज ठाकरेंच्या इशाऱ्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “आम्ही यासंदर्भात उद्या मुंबईला वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रयत्न आहे. अंतिम निर्णय उद्या घेतला जाईल”...