चिंतामणीच्या शतक महोत्सवी वर्षाचा लोगो पाहिलात का?
मुंबई । चिंचपोकळीचा चिंतामणी या नावाने प्रसिद्ध असलेल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षांच्या बोधचिन्हाचे म्हणजेचे लोगोचे अनावरण गुरुवारी शिवाजी मंदिर येथे करण्यात आले. सुलेखनकार अच्यूत पालव यांनी हे बोधचिन्ह रेखाटले आहे. यानिमित्ताने स्वप्न शंभरीचे या कार्यक्रमाचे मंडळाचे अध्यक्ष उमेश सिताराम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. आदेश बांदेकर, खासदार अरविंद सावंत, सुलेखनकार अच्युत पालव, अभिनेत्री स्पृहा जोशी, म्हाडा मुंबई मंडळाचे अध्यक्ष मधू चव्हाण, भाजप उपाध्यक्ष नाना आंबोले, सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर, नगरसेविका उर्मिला पांचाळ, आशिष पेठे, विराज मेहेर, नगरसेवक रमाकांत रहाटे, नगरसेविका सुरेखा लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. याप्रसंगी संगीत सम्राट प्रथमेश मोरे, महेश देवळेकर, शीळ सम्राट निखिल राणे, नृत्य कलाकार सुबोध आरेकर आणि सहकारी या कलाकरांनी आपली कला सादर करून रसिकांची वाहव्वा मिळविली.
| (सुलेखनकार अच्यूत पालव यांनी रेखाटलेले बोधचिन्ह म्हणजेच लोगो.) |
कसे आहे बोधचिन्ह?
बोधचिन्ह रेखाटणारे सुलेखनकार अच्युत पालव म्हणाले की या अगोदर मंडळासाठी ‘चि’ या अक्षरात बोधचिन्ह रेखाटले होते, त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तम प्रतिसाद मिळाला. परंतु शतक महोत्सवी वर्षांच्या उंबरठ्यावर असताना शतक महोत्सवी बोधचिन्हाची संकल्पना जन्माला आली त्यानुसार चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ हे शिस्तीसाठी मैलाचा दगड ठरलेलं आहे. त्यानुसार प्रतिकात्मक मैलाचा दगडाचा वापर बोधचिन्हात करण्यात आला आहे.
मूर्तीकारांसाठी ‘चिंतामणी शतक’ स्पर्धा
महाराष्ट्रातील मूर्तीकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शतक महोत्सवाचा चिंतामणी कसा असेल या दृष्टीने चिंतामणी शतक ही संपूर्ण महाराष्ट्रातील मूर्तीकारांसाठी स्पर्धा पुढील वर्षी माघी गणेशोत्सवा अगोदर घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी मंडळाने दिलेल्या आकारात शाडू मातीपासून मूर्ती बनविण्याचे आव्हान मूर्तीकारांना असणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल.
Comments
Post a Comment