गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त होणार

चंद्रकांत पाटील यांचे अाश्वासन


पेण । मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे येत्या गणेशोत्सवापूर्वी भरले जातील असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पेणजवळील वाशीनाका येथे महामार्गावरील खड्डे पाहणीच्या दौर्‍याच्या वेळी बोलताना दिले.
महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या सात ते आठ वर्षांपासून सुरू आहे. मात्र या महामार्गाची पुरती दुर्दशा झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता अशी अवस्था झाली असून पूर्ण महामार्गावर चिखल व खड्ड्यांचे साम्राज्य पहायला मिळत आहे. त्यामुळे प्रवासी व जनता पूर्णपणे हतबल झाली आहे. जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत असतानाही विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते मंडळी गप्प बसले आहेत. या खड्ड्यांचा फटका केंद्रीय रस्ते मंत्री नितिन गडकरी यांनाही बसला होता. पेण व उरण येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना नितिन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबद्दल खेद व्यक्त केला होता. आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण केले जाईल असे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. 

या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्वात कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांच्या प्रवासात कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी महामार्गावर खड्ड्यांचा पाहणी दौरा सुरू केला आहे. मुंबईपासून सुरू झालेल्या दौर्‍यावेळी रायगड जिल्ह्यातील पेण आणि वडखळ येथील रस्त्याची पाहणी करण्यात आली. यावेळेस मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे हे येत्या 5 सप्टेंबरपर्यंत बुजविण्यात येणार असून जून 2019 पर्यंत मेजर काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तर सायन ते झारप 500 किमी अंतराच्या दरम्यानचे काम डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी बोलताना सांगितले.
तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील रुंदीकरणाच्या कामात येणार्‍या अडथळ्यांवर मार्ग काढण्यासाठी रस्त्याचे रिडिझाईन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महामार्गावर पडलेले खड्डे व कामासंदर्भात राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यांची कानउघड केली. या दौर्‍यात त्यांच्यासोबत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे व राष्ट्रीय महामार्ग व बांधकाम खात्याचे अधिकारी संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला; बुधवारी होणार निर्णय

काळजी घ्या! देशात कोरोना संसर्ग पुन्हा वाढला

नवाब मलिकांची प्रकृती खालावली; जेजे रुग्णालयात उपचार सुरू